मी प्रेमगुरू होतो तेंव्हा…

माणसाला नको तिथे नको त्या वेळी असायची एक जाम वाईट खोड आहे. मोडर्न टाईम्स नावाच्या एका सिनेमात कम्युनिस्ट मिरवणुकीतून पडलेला झेंडा उचलून त्या कम्युनिस्टाच्या हातात देताना चार्ली चापलीन पकडला जातो आणि हकनाक त्याची रवानगी बिनभाड्याच्या घरात होते असा एक प्रसंग दाखवला आहे, तो काही उगाच नाही. साडी महाग आहे असं सांगायची चोरी असल्यानं बायकोसमोर, तुला शोभून दिसणार नाही असं म्हणणारा नवरा “चला, दुसऱ्या दुकानात जाऊ” हे वाक्य ऐकल्या ऐकल्या आपल्या शहाणपणाला शिव्या देत असतो. अनेकदा सवयीचे गुलाम असलेले आपण नको त्या वेळी नको तिथे नको ते बोलून जातो आणि नको ते होऊन बसतं असा माझा आणि अर्थात इतर अनेकांचा अनुभव आहे. इतर वेळी हा अनुभव त्यातल्या त्यात बरा होता पण मी एका जोडप्याचं जुळवून दिलं असं मी म्हणालो आणि तत्क्षणी माझी साडेसाती सुरु झाली.

वास्तविक जुळवून देणं म्हणजे नक्की काय ते मला अजून कळलेलं नाही. कुठला तरी एक बिचारा –तसं एरवी हे महाशय बरेच बेरकी असतात पण अश्या वेळी सारेच बिचारे होतात- कुठल्या तरी एका बिचारीच्या प्रेमात पडतो आणि मग ह्याच्या मनातलं प्रेम तिला जाऊन सांग, ह्याच्या आणि तिच्या मार्गात येणारे काटे दूर कर, असले फुकटचे उद्योग करणे म्हणजे जुळवून देणे असावं असं काहीसं माझं मत आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर स्वतः एकटा जीव सदाशिव असं असताना स्वतःचं सोडून इतरांच्या भाकऱ्या भाजण्याचा हा प्रकार आहे. स्त्री ही जशी एका क्षणापुरती प्रेयसी आणि अनंत काळची माता असते तसंच हा जुळवून वगैरे देणारा माणूस हा एका क्षणाचा देव आणि अनंत काळचा हमाल असतो. जुळवून देणं हा प्रकार मला फारसा कधी जमला आहे असं मला आठवत नाही. तसं खरं सांगायचं तर आमच्या घरचे चतुष्पाद, पाळीव आणि तीनदा घटस्फोटीत (तांत्रिकदृष्ट्या परित्यक्त) सदस्य टपलीश्वर उर्फ टिप्या यांचा त्यांची त्या भाद्यातली हृदयसम्राज्ञी आणि गल्लीतली श्वान-अप्सरा चिंगी हिच्याशी चालू असणारा प्रेमालाप निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आणि ह्या दोघांच्या मध्ये येऊ पाहणाऱ्या टॉमी नामक श्वानाचा दगडी हत्यारांनी पराभव करून त्यास पळवून लावण्याचे कार्य मी यथाशक्ती केले होते. लग्न झाल्यावर करतात तसा वाकून नमस्कार ह्या दोघांनी मला केला होता आणि त्याला उत्तर म्हणून “नांदा शौक्य भले” असा बोबड्या बोलातला आशीर्वादही मी दिला होता. हा आशीर्वाद लवकरच फळाला येऊन चिंगी चार मुलांची आई झाली आणि काही दिवसातच वडलांच्या खांद्यावर मुलांची जबाबदारी टाकून चालती झाली. काही दिवसांनी टपलीश्वरदेखील कुणा एका कुत्रीचं शेपूट धरून पसार झाले, आणि मी जुळवून दिलेल्या संसाराची फलनिष्पत्ती पुन्हा सांभाळासाठी माझ्याच गळी येऊन पडली होती. पण इतक्या अनुभवाने शहाणा होईल तो माणूस कसला. आमच्या नेहेमीच्या अड्ड्यावर मित्रांच्या समोर जेंव्हा “जुळवून द्यायला काय लागतंय? मी पण जुळवल्या आहेत एक-दोन जोड्या.” असं मी बोलून गेलो तेंव्हा ह्या गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

एका भल्या संध्याकाळी गणिताचा क्लास संपल्यावर क्लासमध्ये गप्पा मारल्यामुळे मिळालेल्या चार छड्यांच्या प्रसादामुळे दुखत असलेला हात चोळत आणि मास्तरांच्या कुटुंबाचा उद्धार करत आम्ही नेहेमीच्या चौकात गप्पा मारत उभे होतो. सचिन ग्रेट की गांगुली? गोविंदाचे जोक भारी की फालतू? इथपासून ते अगदी मल्लिका भारी की बिपाशा? असल्या अनेक मौलिक विषयांवर आमचा वाद सुरु होता. इतक्यात चिंत्याने शेजारी उभ्या असलेल्या सद्याला कोपरखळी मारली आणि बुद्धासारखा शांत असलेला सद्या अगदी लोकसभेत शोभेल असा हात वर करून तावातावाने बोलायला लागला. “काय सचिन आणि गांगुली घेऊन बसलात? रिचर्ड्स बघा रे.. काय धुतला होता त्याने एकेकाला म्हणून सांगतो…” आम्ही अवाक की काय म्हणतात तसे होऊन बघत होतो. सद्याचा क्रिकेटचा अभ्यास आम्हा सगळ्यांना ठाऊक होता. क्रिकेट खेळताना सुद्धा सद्या चेंडूला बेटपेक्षा पायाने जास्त मारायचा. आमची टीम जर भारताची टीम असेल तर सद्या हा आमचा आशिष नेहरा (रन उप पाहता) होता. सगळे एकदम चुपचाप झाले. अंत्याने सद्याच्या कपाळाला हात लाऊन त्याला ताप बीप आलाय का हे बघितलं. “सद्या, काय रे लेका? कुठून आला रिचर्ड्स एकदम?” मी न राहवून विचारलं. “तिथून. समोर बघ.” सद्याकडे बघत चिंत्या म्हणाला. आम्ही सगळे समोर बघतो तो समोरून आमच्या वर्गातली चटक चांदणी (तिचं खरं नाव जाहीर करत नाही) सायकलवरून येत होती. सद्या लग्नात मान खाली करून उभे असतात तसा उभा होता. ती गेली ह्याची खात्री पटल्यावर सद्याने मान वर केली आणि लाजून चूर झाल्यावर होतात तसे त्याचे गाल लालेलाल झाले होते. “तिचा आणि रिचर्ड्स चा काय संबंध? ती ठेंगणी आहे एकतर. हां रंगाचा म्हणशील तर तशी निमगोरी आहे. कदाचित तो संबंध असू शकेल.” ती पुढे गेल्यावर अंत्याने अजागळपणे चिंत्याला विचारलं. “ठेंगणी आणि निमगोरी” ही विशेषणं ऐकल्यावर सद्या लालबुंद झाला. “ठेंगणी? अरे लेका पाच फूट आहे ती.” सद्या स्वतः पाच फुट तीन इंच होता आणि आमच्या घराची ३ फुटांची भिंत ओलांडायला त्याला पायाखाली स्टूल घ्यावा लागत असे हा भाग वेगळा. पण पाच फूट ही हिमालयाइतकी उंची असावी अश्या अविर्भावात सद्या बोलत होता. ”आणि निमगोरी म्हणशील तर लेका, तुझ्याहून गोरी आहे ती. कळलं ना?” सद्याने अंत्याची कानउघाडणी केली.

सद्या शुद्ध मराठीत म्हणतात तसा तापला होता. “चिंत्या, भानगड आहे काय नक्की ही?” मी शेवटी न राहवून विचारलं. “सद्यालाच विचार की.” चिंत्या हसत हसत म्हणाला. “सांग सद्या.” मी थोडा दम टाकत म्हणालो. सद्या खाली मान घालून उभा होता. कुठलं तरी मोठ्ठं पाप आपल्या हातून झालंय अशी जाणीव झाल्यावर लोक जसे उभे राहतात तसा सद्या उभा होता. “तू चिरून टाक ही मान, नको अनमान” असल्या कुठल्याश्या गाण्याची मला एकदम आठवण झाली. “अरे आपला सद्या, चटक चांदणी च्या प्रेमात पडला आहे.” चिंत्याने अखेर गुपित फोडलं. सद्याने एकदम मान वर केली. त्या नजरेच्या धाकानेच चिंत्याचं पाणी पाणी झालं असावं. “सद्या, खरं आहे हे? आयला तू आणि चटक चांदणी? लय भारी. तरीच मी म्हणतोय हा लेकाचा रिचर्ड्सचा गजर कसा करायला लागला. चटक चांदणीच्या बापाचा.. चुकलो वडिलांचा लेख आलाय ना पेपरात रिचर्ड्सबद्दल.” अंत्याने उरलासुरला फुगा फोडला होता आणि सद्याची वाघासारखी तीक्ष्ण नजर आता कोकराइतकी करुणामय झाली होती. “ए बाबांनो कुठे बोलू नका.. नाहीतर तिचा भाऊ माझी चटणी करेल.” सद्या अगदी रडघाईला आला होता.

सदोबा खरे हे म्हणजे खरं तर एक फार मोठं ध्यान आहे. सद्या म्हणजे आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये धांदरटपणाचा मेरुमणी म्हणून ओळखला जात असे. डोळ्यावर पुस्तकं वाचून जाड झालेला चष्मा आणि त्या चष्म्याच्या अडून लुकलुकणारे इवलेइवले पाणीदार डोळे, किडकिडीत शरीर, बेंबी हीच कंबर धरून नेसलेली तुमान आणि सतत खाली घसरणाऱ्या त्या तुमानीला डाव्या हाताने आणि खाली सरकणाऱ्या चष्म्याला उजव्या हाताने एकदम वर ओढायची सवय ह्या सद्याच्या ट्रेडमार्क गोष्टी होत्या. ह्या जोडीला थोडासा अबसेन्टमाईंडेड असावा म्हणतात त्यातला सद्या होता. उलट चटक चांदणी म्हणजे नावाप्रमाणेच अगदी मॉड होती. वर्गातली पहिली बॉबकट असा तिचा दरारा होता. मुलगी वाढदिवसाला टी शर्ट आणि जीन्स घालून आली आणि इयत्ता नववी तुकडी अ च्या वर्गाचं नाव शाळाभर प्रसिध्द झालं होतं. अश्या ह्या विश्वामित्राला (खरंतर गबाळा नारायण म्हणायला हवं, पण असो.) ही मेनका कुठून आवडली असा आम्हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. खरं तर सद्यासाठी वर्गातली दार वर्षी पहिल्या पाचात येणारी, दोन वेण्या घालणारी, घरीच नारळाच्या तेलाचा घाणा असावा इतकं तेल डोक्याला चापून येणारी, आणि सद्यासारखीच चार डोळे असणारी (दोन नेहेमीचे आणि दोन चष्म्याचे) शकुंतला आम्ही निवडली होती. त्यामुळे चटकचांदणी हे नाव ऐकताच आम्हा सगळ्यांची पाचावर धारण बसली. “सद्या लेका, कळतंय का तुला? ती कुठे? तू कुठे? कुठे मुंबईचं ताज, कुठे आपल्या वाडीतलं होटेल साज? इच गार्ड नसताना कुठून आली अशी खाज?” अंत्यामधला किलर कवी जागा झाला होता. “अंत्या लेका, तुझ्या कवितांना काही हाड?” न राहवून मी म्हणालो. इतक्यात समोरून आमच्या मातोश्री हातात भाजीची पिशवी घेऊन येताना दिसल्या आणि मी सटकलो. “उद्या बोलू काय ते.” जाता जाता मी म्हणालो.

दुसऱ्या दिवशी रागरंग काही वेगळाच होता. सद्याचा मिर्झा गालिब, मजरूह सुलतानपुरी, अगदी झालं तर गेला बाजार अंत्या कुलकर्णी झाला होता. चटकचांदणीच्या न पाहिलेल्या गॉगल वरून चष्मेबद्दू, तिच्या केसांवरून “ये रेशमी झुल्फे” असल्या काहीबाही गाण्यांचा रतीब सद्या गणिताच्या तासाला माझ्या शेजारी बसून घालत होता. ये रेशमी झुल्फे म्हणताना चटकचांदणी बॉबकटवाली आहे हा तपशील सद्य विसरला होता. अंत्याने खोचकपणे त्याची आठवण करून दिल्यावर “वाढवेल ती केस नंतर.. आणि काय सुंदर दिसेल रे ती.. अहाहा…” शेवटलं अहाहा म्हणताना सद्याने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. मी कपाळावर हात मारला. सद्या पार वाया गेला होता. अगदी अंत्याचे टोमणे लागू नये इतका. भूगोलाच्या तासाला स्वतः लिहिलेली कविता सद्याने अंत्याला वाचायला दिली. “बेष्ट है..” अंत्या म्हणाला आणि लगेच “कागद चांगला आहे.. कुठून घेतलीस रे वही?” असं विचारत त्याने सद्याला हरभऱ्याच्या झाडावरून एकदम जमिनीवर आदळलं. “लेका, कागद काय बघतोस? कविता वाच.” भूगोलाच्या गोलाइतक्याच गोल असणाऱ्या पोटभरेबाईंची नजर चुकवत सद्या म्हणाला. “कविता? अरे असल्या कवितांनी तिचं कुत्रं पण पटणार नाही तुला.” अंत्याने सद्याला आणखी एक धोबीपछाड दिला. सद्याला ओशाळल्यागत झालं. मधल्या सुट्टीत डबा खायला देखील सद्या आला नाही. “अंत्याची कॉमेंट मनाला लाऊन घेतली सद्याने.” कळवळून चिंत्या बोलला. “सद्या, अरे एका मुलीचं काय घेऊन बसलास? चल जेवायला. मी बघतो काय करायचं ते. तुझं आणि तिचं मी जुळवून देतो.” उत्साहाच्या भरात मी हे असलं बोलून गेलो आणि आपल्या पाणीदार डोळ्यांतून माझ्याकडे बघत सद्या म्हणाला “खरंच?” असं उत्साहात असणाऱ्या माणसाला काही उमगत नाही. “जुळवून द्यायला काय लागतंय? मी पण जुळवल्या आहेत एक-दोन जोड्या.” यडचापसारखं मी ही हो म्हणून गेलो. “गेलो आपण कामातून. हा लेकाचा प्रेमगुरू आणि सद्या शिष्य म्हणजे झालंच.” अंत्या म्हणाला. पण त्याच्याकडे माझं लक्ष्य नव्हतं. समोर फक्त एकच ध्येय होतं. सद्या आणि चटकचांदणी. मी प्रेमगुरू होणार होतो.

क्रमश:

About shree

नमस्कार.. मी श्रीनिवास... माझे छंद अनेक आहेत. लिहिणे...वाचणे,,,आकाश दर्शन.. (मी ह्याला पूर्वी तारका दर्शन म्हणायचो पण श्लेष अलंकाराचा धसका घेऊन मी तो शब्द सोडला.)...असो.. खाणे, गाणे आणि फिरणे ह्या तीन णे-कारांत शब्दांवर माझी भक्ती आहे (कदाचित ती माझ्या नाकर्तेपणामुळे सुद्धा असेल.).. तर माझा ब्लॉग पहा.. वाटले तर जरूर वाचा. आणि प्रतिक्रिया द्या..धन्यवाद..
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

1 Responses to मी प्रेमगुरू होतो तेंव्हा…

  1. मदुरा म्हणतो आहे:

    बेष्ट…!!

यावर आपले मत नोंदवा