समाधी

एक राष्ट्र, एक समाज ही एक जिवंत व्यक्ती आहे. समाजपुरुष हा शब्द त्यासाठी प्रचंड चपखल बसतो. त्या समाजपुरुषाच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. मी मी म्हणणाऱ्या राजे लोकांची कारकीर्द संपून जाते पण या समाजपुरुषाच्या हातावरच्या घड्याळातला सेकंद काटा सुद्धा पुढे सरकलेला नसतो. कित्येक पिढ्या गेल्या तरी या समाजपुरुषाच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलत नाही. पण काही क्षणांच्या घटना होतात जेंव्हा हा समाजपुरुष थबकतो आणि टक लावून बघत बसतो, कान देऊन ऐकू लागतो. आपल्या सर्व इंद्रियांनी तो क्षण टिपून घेऊ पाहतो. त्या समाजपुरुषाच्या आयुष्यात तो क्षण चिरंतन होतो. त्याच्या कथा बनतात. कोण्या एका संध्याकाळी तो समाजपुरुष त्या कथा आठवतो, शहारतो, चिडतो, गहिवरतो. हो..गहिवरतो. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत एक अद्भुत शिरशिरी त्याच्या नसानसातून वाहू लागते. एका माणसाने किंवा एका समूहाने त्या समाजपुरुषाला अंतर्बाह्य बदलून टाकलेलं असतं. महाभारतात कृष्ण गीता सांगताना हा समाजपुरुष असाच थबकला होता. रामाने शबरीची बोरं खातानाही तो थांबला होता. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तेंव्हाही तो समाजपुरुष आ वासून उभा होता. काही आठवणी या अशा असतात. पण एक आठवण जी अवघ्या मराठी समाजपुरुषाच्या मनावर आघात करून गेली आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी.

कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, आळंदी येथे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. ६ फेब्रुवारी १२९४ ला देवगिरीवर यादवांची कत्तल उडाली आणि त्या नंतर दीडच वर्षांनी म्हणजे २४ ऑक्टोबर १२९५ ला ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वरांची समाधी हा महाराष्टाच्या समाजपुरुषाला बसलेला प्रचंड मोठा धक्का होता. ही गोष्ट अभूतपूर्व होती. २२ वर्षाच्या मुलाने समाधी घेणं हा काय विलक्षण विचार होता. काल तिथी नुसार त्या घटनेला ७२५ वर्षं पूर्ण झाली.

मी ज्ञानेश्वरी वाचली नाही. मी संत साहित्याचा अभ्यासक नाही. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा जो काही थोडाफार अर्थबोध मला झाला त्याला ज्ञानेश्वर माऊली हा लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकरांचा अल्बम जबाबदार आहे. घरी रेशमी कापडात गुंडाळून ठेवलेली मामासाहेब दांडेकरांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरीची एक प्रत आहे. ती ज्ञानेश्वरी वाचायला घेतली होती, पण पहिल्या पानावर “येथे शहाणपण शहाणे झाले” असं लिहून ज्ञानेश्वरांनी मला जो काही वेगळा आनंद दिला त्या आनंदात न्हात बसलो आणि पुढची ज्ञानेश्वरी राहून गेली. मला त्या नंतर ज्ञानेश्वर बघायला मिळाले ते इंद्रायणी काठी मध्ये. भीमसेन जोशी गाताना मधूनच एकदा “विठ्ठला मायबापा” म्हणतात. ती साद मला इंद्रायणीच्या काठी घेऊन गेली. त्या दुपारी तिथे जमलेल्या सर्वांच्या काळजातून हि एकच साद गेली असेल. ज्ञानेश्वर गेले. ज्या माऊलीने इतके दिवस सांभाळ केला ती गेली. ही कल्पना करूनही प्रचंड गहिवरून येतं.

ज्ञानेश्वरांनी काय केलं? ज्ञानेश्वरांनी भक्तीचं बीज पेरलं. पुढे अनेक वर्षं महाराष्ट्राला जिचा आधार झाला अशी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर कवी म्हणून प्रचंड सुंदर आहेतच. पण त्यांच्या अनुभवातून त्यांच्या शब्दांमध्ये आलेली सहजता विशेष आहे. आपल्या परमेश्वर प्राप्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात “अवघेंचि वैकुंठ चतुर्भुज”. हे असं इतकं सहज नक्की कसं सुचलं असेल याचं कोडं पडतं. पण तेच ज्ञानेश्वरांचं कार्य होतं. ज्ञानेश्वरांच्या आरतीमध्ये एक ओळ आहे “प्रकट गुह्य बोले”. हे असं गुपित इतक्या उघडपणे सांगणं कदाचित कुणाला जमणार नाही. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेंव्हा तुम्हाला जाणवतं कि हे त्या अनादि अनंत ब्रह्मतत्त्वाचं स्वरूप आहे. पण आपण तिथेच थांबतो. मी पाहिलं हि कल्पना येते. दुःख येतं, कसल्या कसल्या इन्सिक्युरिटी येतात, त्या नदीत डुंबत असताना आपल्याला आपल्यापासून काही काही सुटत चाललंय असं दिसू लागतं. त्या अनुभवात आपण विरघळत असतो. नेमकं तेंव्हाच आपला पाय अडकतो. नेमकं तेंव्हाच आपण थबकतो. तो क्षण, ज्याची आपण वाट बघत असतो, त्या क्षणात जिथे विरघळायचं असतं तिथे आपण आडमुठेपणाने स्वतःच्या अस्तित्वाच्या नको त्या अंगांना कवटाळून बसतो. ज्ञानेश्वरांना जमलं कारण तो माणूस विरघळला होता.

समाधीच्या त्या दोन तीन तासांत काय झालं असेल? नामदेव सांगतात “देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानदेव समाधीसी।।”. या वेळी निवृत्तीनाथांना काय वाटलं असेल याची कल्पना करवत नाही. पण कदाचित इतिहासाच्या पानांत जे सापडलं नाही ते माडगूळकरांना सापडलं. “उजेडी राहील उजेड होऊन । निवृत्ती सोपान मुक्ताबाई ।।” हा जो ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकाश ज्ञानेश्वरांनी पसरवला होता त्यात उजेड म्हणून हि भावंडं राहिली. सूर्य असताना लागलेल्या दिव्यासारखी. त्यांचा आत्मा पुढे निघून गेला होता.

ज्ञानेश्वरांचा प्रवास इथवर थांबत नाही. पुढल्या कित्येक पिढ्यांच्या कवींना, संतांना ते प्रेरणा देत राहतात. इतकं कि विसाव्या शतकातला कवी जेंव्हा भैरवी म्हणून मैफल संपवू पाहतो तेंव्हा त्याला ज्ञानेश्वर आठवतात. हे सगळं जे लिहिलंय ते खूप त्रोटक आहे. आत जे आहे त्याचा अगदी थोडासा भाग आत्ता शब्दांत मांडू शकलोय. काही काही वाचत असताना ज्ञानेश्वर आठवतात तेंव्हा नकळत मन पक्षी बनून उडतं आणि इंद्रायणीच्या काठी असलेल्या एखाद्या झाडावर जाऊन बसतं. दूर कुठेतरी माणसांचा घोळका दिसतो. शिळा सरकवून एका गुहेचा दरवाजा बंद करणारे निवृत्तीनाथ दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत. कल्पनाही करवत नाही. समोर उभे असलेले वारकरी दिसत असतात. पांडुरंगाच्या नावाचा जयघोष सुरु असतो. त्या नामाच्या कीर्तनात दबलेले हुंदके ऐकू येत नाहीत. ज्ञानेश्वर गेले या घटनेला ७०० हुन जास्त वर्षं झाली आहेत. पण ते गेले अशी कल्पना करूनही अंगावर काटा येतो.

बहुत काय लिहिणे !

१३ डिसेंबर २०२०
पुणे

About shree

नमस्कार.. मी श्रीनिवास... माझे छंद अनेक आहेत. लिहिणे...वाचणे,,,आकाश दर्शन.. (मी ह्याला पूर्वी तारका दर्शन म्हणायचो पण श्लेष अलंकाराचा धसका घेऊन मी तो शब्द सोडला.)...असो.. खाणे, गाणे आणि फिरणे ह्या तीन णे-कारांत शब्दांवर माझी भक्ती आहे (कदाचित ती माझ्या नाकर्तेपणामुळे सुद्धा असेल.).. तर माझा ब्लॉग पहा.. वाटले तर जरूर वाचा. आणि प्रतिक्रिया द्या..धन्यवाद..
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

यावर आपले मत नोंदवा